
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सीटी बनवणार, विकास करणार अशा घोषणा दिल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, अशी राणाभीमदेवी थाटात गर्जना केली पण मोदी फुसका बार निघाले. १२ वर्षापासून देशात अक्षरशः लुट सुरु आहे, दोन गुजराती देश विकत आहेत तर दोन गुजराती खरेदी करत आहेत. देशात जे सुरु आहे तेच महाराष्ट्रातही सुरु आहे, ‘बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां भी सुभानल्ला’, अशी परिस्थिती आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे पण भाजपाच्या राजवटीत देशातील अन्नदाता देशोधडीला लागला आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली नाहीत. शेतमालाला दुप्पट भाव तर मिळत नाहीच उलट शेतीसाठी लागणारा खर्च मात्र दुप्पट, तिप्पट वाढला आहे. नरेंद्र मोदींनी दबावाखाली अमेरिकेशी व्यापार करार केला असून ट्रम्पच्या धमकीला मोदी घाबरतात. या करारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील तरूण, कामगार, कष्टकरी, शेतकरी, सर्वांची नरेंद्र मोदी यांनी फसवणूक केली आहे. विकासाचा दावा करणारे मोदी सरकार देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे.
पुलवामा अतिरेकी हल्लात आपले जवान शहीद झाले या हल्ल्यात वापरलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. पहलगावमध्ये सीमेपासून ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी २६ लोकांची हत्या केली पण आजही हे अतिरेकी मोदी सरकारला सापडले नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्य दमदार कामगिरी करत असताना डोनाल्ड ट्रम्पने एक फोन केला आणि नरेंद्र सरेंडर झाले. इंदिराजी गांधी यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले आणि शिमला करार केला पण नरेंद्र मोदी मात्र अमेरिकेसमोर झुकले आहेत, अमेरिका सांगते तसे त्यांना करावे लागते, देशाचा स्वाभिमान मोदींनी गहाण ठेवला आहे. भारत पाकिस्तानच्या प्रश्नावर आता डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करतात, आपल्या पंतप्रधानाला सरेंडर म्हणाले लागते हे दुर्दैवी आहे असे सपकाळ म्हणाले..


























































