काँग्रेसला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

2227

माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कमळ हाती घेतले. यावेळी मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंगलप्रसाद लोढा आणि किरीट सोमय्या हे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्याने ‘हात’ सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन यांच्या भाजपप्रवेशामुळे पक्षाला बळ मिळाल्याचे म्हटले. लोकसभेपूर्वी भाजपमध्ये आले असते तर बारामती जिंकली असती असेही ते म्हणाले. हर्षवर्धन पाटलांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांना योग्य सन्माम पक्षाकडून दिला जाईल असेही ते म्हणाले. तर अतिशय योग्य वेळी हर्षवर्धन यांचा भाजपप्रवेश झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

विनाअट भाजपमध्ये आलोय
पक्ष प्रवेशावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, हा ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच मी विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या