काँग्रेस महायुतीतील पक्षांसोबत राज्यात कुठेही आघाडी करणार नाही

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी वा युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असले तरी महायुतीतील कोणत्याही पक्षाही युती केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज स्पष्ट केले. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या निवडणूक मंडळाच्या बैठकीनंतर आघाडीबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणून चर्चा करण्याच्या सूचना स्थानिक नेतृत्वाला दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी घटक पक्ष तसेच स्थानिक आघाडीसंदर्भात चर्चा केली आहे. वामनराव चटप, राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा पक्ष यांच्याशी चर्चा सुरू असून काही जिह्यांत वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी झाली आहे. मनसेसंदर्भात आघाडीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष विचारधारेवर अढळ असून ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे. इंडिया आघाडीतील पक्ष व इतर समविचारी पक्षांशी आघाडीबाबत चर्चा होत आहे असे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईनऐवजी केवळ ऑफलाईन करावी, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ आणि अर्ज भरताना काटेकोरपणा हे षडयंत्र आहे का, अशी शंका हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.