
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे मंत्रीपदाची शपथ घेतली. याच भुजबळांवर विरोधात असताना भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”छगन भुजबळही आज भाजपच्या वॅाशिंग मशीनमध्ये धुऊन स्वच्छ झाले”, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
”छगन भुजबळही आज भाजपच्या वॅाशिंग मध्ये धुऊन स्वच्छ झाले. ज्या छगन भुजबळांवर भाजपने आरोपांची राळ उठवली, ईडी लावून त्यांना जेलमध्ये पाठवले. त्याच भाजपाने त्यांना आता पावन करून घेतले आहे. सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे”, असे ट्विट सकपाळ यांनी केले आहे.