टिपू सुलतानवरून घमासान! पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा तोडफोड, तुफान दगडफेक; दोन महिला कॉन्स्टेबलसह नऊजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवनासमोर राडा केला. तर काँग्रेसचे कार्यकर्ते सपकाळ यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दगडफेकीत  वाहनांचे नुकसान झाले, तर 2 महिला कॉन्स्टेबल, 2 पत्रकार, पाच कार्यकर्ते असे नऊजण जखमी झाले.

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला. अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने काँग्रेस भवनसमोर आंदोलन केले. काँग्रेसही सपकाळ यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरली. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजीने सुरू झालेले आंदोलन दगडफेकीपर्यंत गेले. सुमारे दोन तासांच्या राडय़ानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, आमच्या पक्षावर हल्ला करण्याची ही तिसरी वेळ आहे. तीन वेळा हल्ला करूनदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. याबाबत मी पत्र दिले होते. आज भाजप कार्यकर्ता दुष्यंत मोहोळ याने हल्ला केला. तरीही उलट आमच्यावरच गुन्हे अशी परिस्थिती आहे. पोलिसांनी काळजी घेतली असती तर काँग्रेस कार्यकर्त्याचे रक्त सांडले नसते.

धीरज घाटे म्हणाले, शहर भाजपने काँग्रेस भवनाजवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात निषेध आंदोलन केले. काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कधीच आदर नव्हता, हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

दोन पत्रकार जखमी

या तुंबळ हाणामारीत महिला पत्रकारासह दोन पत्रकार जखमी झाले. वार्तांकन करत असताना पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघाने तीक्र निषेध केला आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी संघाने केली आहे.

पोलिसांनी खतपाणी घातले – जगताप

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत हल्ला चढवण्यात आला. आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आली. पुण्याला काळिमा फासण्याचे काम भाजपच्या लोकांकडून झाले आहे. भाजपने अराजकतेची आणि डोके फोडण्याची संस्कृती पुण्यात आणलेली आहे. याला पुणे शहर पोलीसदेखील जबाबदार आहेत.  सगळ्या गोष्टीला पोलिसांनी खतपाणी घातल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केला.

काँग्रेसने दगडफेक केल्याचा आरोप

पोलिसांची परवानगी घेऊन आम्ही आंदोलन केले. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व शहराध्यक्ष म्हणून माझ्यासहित भाजपचे कार्यकर्ते सनदशीर मार्गाने आंदोलन करून हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा निषेध करत होते. त्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जमाव जमवला. आंदोलन संपल्यानंतर आम्ही निघत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि पत्रकार जखमी झाले. याविरोधात भाजपने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटले आहे.

पोलिसांचे भाजपच्या आंदोलकांना संरक्षण

काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मात्र पोलिसांनी भाजप आंदोलकांना संरक्षण दिले, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी पोलिसांच्या कारवाईवर टीका होत आहे. दुसरीकडे ज्या वेळी एपस्टीन फाइल्सच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत होते, त्या वेळेस काँग्रेसला बालगंधर्व चौकातच अडविण्यात आले, पोलिसांच्या या भाजप समर्थन भूमिकेवर सोशल मीडियावर टीका होत आहे.

आम्ही काँग्रेस भवनात बसलो होतो. बाहेरून अचानक दगडांचा मारा झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेली दगडफेक ही पुण्याच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारी आहे. पत्रकारांवरही हल्ला झाला, हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. – अक्षय जैन, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

फडणवीसांना दंगली घडवायच्यात – सपकाळ

देश व राज्यातील ज्वलंत मुद्दय़ांना बगल देण्यासाठीच माझ्या वक्तव्याची मोडतोड करून फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला. ‘ध’ चा ‘मा’ करण्याची त्यांची खोड जुनीच आहे, असे ते म्हणाले.