
सातारा जिल्ह्यात सातत्याने ड्रग्स जप्त केले जात आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांना महायुतीला घेरले आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली असून खरा आका हे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सातारा जिल्ह्यातील ड्रग्सप्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, याआधी सातारा जिल्ह्यात ड्रग्सचा एक कारखाना सापडला होता, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या शेतात होता. याठिकाणी काम करणाऱ्या 43 पैकी 40 बांगलादेशी कामगारांना सोडून देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना क्लिन चिट देऊन टाकली. त्यावेळीच कठोर कारवाई केली असती तर आज पुन्हा ड्रग्सचा मोठा साठा सापडला नसता.
ड्रग्सच्या काळ्या धंद्यातून आलेला पैसा मतदार व विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी खरेदी करण्यासाठी केला जात आहे. या सर्व प्रकरणाचा खरा आका हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केला आहे.
संविधानिक पदाचा अपमान करणाऱ्यांना पद्म पुरस्कार
भगतसिंह कोश्यारी हा विकृत माणून असून संविधानिक पदाचा त्यांनी अपमान केलेला आहे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या तसेच शिव, शाहू, फुले यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने मला पुरस्कार जाहीर केला होता, मात्र तो पुरस्कार कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात येणार होता, त्यामुळे मी त्या पुरस्काराला नकार दिला, असेही सपकाळ म्हणाले.
दावोस गुंतवणुकीची वस्तुस्थिती जाहीर करा
दावोसमधील गुंतवणुकीसंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यात गुंतवणूक आली पाहिजे पण देवेंद्र फडणवीस हे, खोटं बोल पण रेटून बोल, पद्धतीने मोठे दावे करत आहेत. याआधी त्यांनी दावोसमधून 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचा दावा केला होता, त्याची वस्तुस्थिती काय, हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.



























































