
जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांना ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ची शिकवण दिली जात आहे. विद्यापीठात एक नवीन कोर्सचा अभ्यासक्रम शिकवला जात असून त्याचे नाव ट्री म्हणजे झाड आहे. या कोर्सची सुरुवात हार्वर्डच्या अर्नोल्ड आर्बोरिटमचे (ट्री म्युझियम) संचालक आणि डेव्हलपमेंटल बायोलॉजिस्ट विल्यम फ्रीमॅन यांनी केली आहे. या कोर्सचे शिक्षण बंद खोलीत किंवा लॅबमध्ये होत नाही, तसेच येथे वनस्पतिशास्त्राची (बॉटनी) जड पुस्तकेही पाठ करावी लागत नाहीत. येथे खरे ‘प्रोफेसर’ माणूस नसून ‘झाडे’ आहेत. झाडेच विद्यार्थ्यांना जवळीक, संयम आणि गुण्यागोविंदाने राहण्याचा सखोल धडा शिकवतात. पहिल्या दिवशी संपूर्ण क्लास 281 एकरमधील आर्बोरिटममध्ये फिरायला जातो. येथील 16 हजारांहून अधिक झाडांपैकी प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड निवडावे लागते. हे झाड संपूर्ण सेमिस्टरमध्ये त्यांचा सोबती बनते. तेच झाड साप्ताहिक असाइनमेंट, अंतिम प्रोजेक्टचा विषय असते. या कोर्सचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ‘सहानुभूती’ जागृत करणे हा आहे.




























































