
अश्लील हावभाव करून विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या विकृत तरुणाची एका महिला ड्रायव्हरने धुलाई केली आहे. ही घटना हरयाणा येथे घडली असून या महिला ड्रायव्हरचं नाव पंकज असं आहे. पंकज या हरयाणाच्या पहिल्या महिला बस चालक आहेत.
न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी हरयाणातील सिरसा इथे घडली. येथील राजकीय महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना नेण्या-आणण्याची जबाबदारी पंकज यांच्यावर आहे. जवळपास एक ते दीड महिना एक विकृत तरुण या विद्यार्थिनींच्या मागावर होता. तो सतत त्यांच्या बसचा पाठलाग करून त्यांची छेड काढत असे. शनिवारी सकाळीही या तरुणाने बाईकवरून मुलींच्या बसचा पाठलाग करत त्यांची छेड काढली होती. शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमाराला विद्यार्थिनींना घेऊन पंकज परत जात होत्या, तेव्हा त्या तरुणाच्या घरासमोरून बस गेली. बसला पाहून तो पुन्हा त्यांचा पाठलाग करू लागला आणि त्याने त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव करायला सुरुवात केली. ते पाहून पंकज यांनी बस थांबवली.
बस थांबलेली पाहून तो तरुण घाबरून पळू लागला. पंकज यांनी तब्बल एक किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि त्याचं बखोटं पकडून त्याला बसकडे घेऊन आल्या. तिथे आणून त्यांनी त्या तरुणाला चोप द्यायला सुरुवात केली. या दरम्यान तो तरुण माफी मागत होता, मात्र पंकज यांनी त्याची धुलाई सुरूच ठेवली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हरयाणा पोलिसांनीही पंकज यांच्या धाडसाचं कौतुक केलं असून तरुणाला अटक केली आहे.

























































