हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपकडून 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. परंतु ही उमेदवारी यादी जाहीर होताच भाजपमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. या यादीद्वारे जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला, परंतु त्यांची ही खेळी त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र आहे. पहिली यादी जाहीर होताच भाजपच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱयांनी नाराज होत पक्षाला रामराम ठोकल्याचे उघड झाले आहे. अनेक नेत्यांनी भाजपच्याच नेत्यांविरोधातच अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हरयाणात भाजपचे टेन्शन वाढले असून विधानसभा निवडणुकीची वाट आणखी बिकट झाली आहे.
तिकीट मिळाले नाही म्हणून कोसलीचे माजी मंत्री विक्रम ठेकेदार, रेवाडीचे माजी जिल्हाप्रमुख सतीश यादव आणि प्रशांत ऊर्फ सन्नी या तीन नेत्यांनी आज भाजपा नेत्यांविरोधातच अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. सतीश यादव आणि प्रशांत ऊर्फ सन्नी हे दोन्ही नेते 11 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज रविवारी तीन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली आणि विविध मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा केली. पाच दिवसांपूर्वी भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेल्या उमेदवारांना तीव्र विरोध होताना दिसत आहे.
काँग्रेसमध्येही टेन्शन
काँग्रेसनेही हरयाणा विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, मात्र पहिल्याच यादीत नाव नसल्याने अनेक नेते नाराज झाले. त्यामुळे काँग्रेसचीही डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत कुस्तीपटू विनेश फोगाट, हरयाणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय भान, आमदार राम करण काला आणि अपक्ष आमदार धरम पाल गोंदर यांना विधानसभेचे तिकीट दिल्याने अनेकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आज अनेक नेत्यांनी जाहीर विरोध दर्शवत समर्थकांसोबत बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जाट समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न
भाजपने 67 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 13 जाट उमेदवारांना विधानसभेचे तिकीट दिले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव हा पंजाब आणि हरयाणात दिसला होता. या भागातील बहुसंख्य शेतकरी जाट समाजाचे आहेत. त्याशिवाय कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर ही जाट समाज भाजपपासून दूर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे जाट समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने पहिल्या यादीतून केल्याचे समोर आले आहे.
बनिया आणि जैन समाजात नाराजी
भाजपने पहिल्या यादीत 13 दलित, 9 ब्राह्मण, 8 पंजाबी, 5 वैश्य, 2 राजपूत आणि एका शीख उमेदवाला संधी दिली आहे. त्यामुळे बनिया आणि जैन समाजाच्या भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. भाजप खासदार आणि उद्योगपती नवी जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल यांनी हिसारमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तर सोनिपतमधून तिकीट नाकारल्याने माजी मंत्री कविता जैन आणि भाजपचे हिसारचे नेते तरुण जैन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दोघेही अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या बिझनेस सेलचे सहसंयोजक नवीन गोयल यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
16 ओबीसी समाजातील उमेदवारांनाही संधी
जाट समाजाशिवाय भाजपने 16 ओबीसी समाजातील उमेदवारांनाही संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहारमधील काही जागांवर फटका बसला. त्यामुळेच भाजपने 16 ओबीसी समाजातील उमेदवारांचे नाव पहिल्या यादीत जाहीर केले आहे. असे असले तरी पहिल्या यादीत नाव नसल्याने पक्षाचे राज्य ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष करणदेव पंबोज यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्याचा फटकाही भाजपला हरयाणा विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेस–आपच्या आघाडीवर शिक्कामोर्तब
हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये आघाडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. काँग्रेसने आपल्याला पाच जागांची ऑफर दिली असून ‘आप’ने यावर सहमती दर्शवल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दोन्ही पक्ष 9 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.