हरयाणात त्रिशंकू, विधानसभा सत्तेच्या चाव्या चौटालांकडे

590

लोकसभा निवडणुकीत सर्व दहा जागा जिंकणाऱया भाजपला हरयाणा विधानसभा निवडणुकीत मात्र एकहाती बहुमत मिळाले नाही. त्रिशंकू विधानसभा येथे अस्तित्वात आली असून सत्तेच्या चाव्या जननायक जनता पार्टीचे दुष्यंत चौटाला यांच्या हाती आहेत.

विधानसभेच्या 90 जागांपैकी भाजपला 40 जागांवर विजय मिळाला. सत्ता स्थापनेसाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. काँग्रेस 31 जागांवर विजयी झाली तर दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीला 10 जागा मिळाल्या आहे. हरयाणा लोकहित पार्टी आणि इंडियन नॅशनल लोकदलाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

हरयाणा विधानसभा
एकूण जागा – 90
बहुमताचा आकडा- – 46
भाजप – 40 काँग्रेस – 31
जेजेपी – 10 आयएनएलडी-01
अपक्ष व इतर -08

ठळक वैशिष्टय़े
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि अनिल विज वगळता भाजपचे इतर सर्व आठ मंत्री पराभूत झाले.
भाजपमध्ये प्रवेश करून कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट हे निवडणूक रिंगणात उतरले होते. दोघांचाही दारुण पराभव झाला. हिंदुस्थानच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीपसिंह हे मात्र विजयी झाले आहेत. ‘टिकटॉक’ स्टार सोनाली फोगाटही पराभूत झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बर्नाला हे पराभूत झाले. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचा पराभव झाला आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 47 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस 17 जागांवर होती. यावेळी काँग्रेसची कामगिरी सुधारली असून 30 जागांवर विजय मिळाला आहे. सत्तेच्या चाव्या दुष्यंत चौटाला यांच्या हातात आहेत. भाजपला बहुमतासाठी सहा आमदार कमी आहेत. 46 जागा लढविणाऱया आम आदमी पार्टीला एकही जागा मिळाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या