
कोरोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम आहे. 70 टक्के लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वक्तव्य करताना काँग्रेस नेते मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी जोपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 70 टक्के नागरिकांना लसीकरण होत नाही तोपर्यंत निवडणुकाच होणार नाहीत. तोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला असेल, असे स्पष्ट केले.
कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही
विजय वडेट्टीवार यांना मुंबई लोकलबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही. राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिह्यांत अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपचे वरातीमागून घोडे – विजय वडेट्टीवार
भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या आंदोलनाआधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

























































