
निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी येथे 5 आणि 6 सप्टेंबर रोजी भूगर्भातून गुढ आवाज येऊन जमीन हादरल्याची घटना घडली होती. तशाच रीतीने पुन्हा एकदा आज दुपारी सव्वादोन च्या सुमारास भूगर्भातून गुढ आवाज येऊन जमिनीला हादरा बसला. यामुळे गावातील नागरिकांची घरातून बाहेर पडण्यासाठी एकच धावपळ उडाली. चार दिवसात तिसऱ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे हासोरी गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात 1993 साली किल्लारी येथे झालेल्या भीषण भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 6 सप्टेंबर रोजी जमिन हादरल्यानंतर 7 सप्टेंबरबर रोजी निलंग्याचे तहसीलदार घोळवे व मंडळ अधिकारी निटूरकर यांनी भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधत सदरील घटना म्हणजे भूकंप नसून महाराष्ट्रात कोठेही भूकंपाची नोंद झाली नाही असे सांगितले होते व नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असेही सांगितले होते. मात्र वारंवार होत असलेल्या घटनेमुळे नागरिकात भीती निर्माण झाली आहे.



























































