
रेल, मेल (डाक) आणि जेल हे तीन विभाग कधीही सुट्टीवर नसतात, अखंड काम करत असतात. अत्यावश्यक सेवेत असलेल्या डाक विभागातील पोस्टमन हे ऊन असो वारा असो वा पाऊस अखंड सेवा देत असतात. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून विलेपार्ल्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने टळटळीत उन्हातही सेवा देणाऱया पोस्टमनना टोपीवाटप करण्यात आले आणि अखंड सेवेबद्दल त्यांचा महाराष्ट्रदिनी पुष्पगुच्छ देऊन गौरवही करण्यात आला.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून युवा सेनेचे विलेपार्ले विधानसभा चिटणीस हंसराज गुप्ता चाचाउद्दीन यांच्या पुढाकाराने विलेपार्लेतील डाक सेवेतील पोस्टमनचा विशेष गौरव करण्यात आला. टळटळीत उन्हातानातून सेवा देताना त्यांना दिलासा मिळवा यासाठी सर्व पोस्टमनकाकांना गुप्ता यांनी टोप्यांचे वाटप केले. त्याचबरोबर कामगार दिनाच्या निमित्ताने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरवही करण्यात आला. यावेळी उपविभाग प्रमुख शरद जाधव, शाखा क्रमांक 70 चे संजय जाधव शिवसैनिक युवासैनिक आणि डाक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.