
वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र रक्तसंक्रमण विभाग असावा व त्यासाठी पद असावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याची दखल घेत न्यायालयाने वैद्यकीय शिक्षण विभागाला याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 9 मार्चला पुढील सुनावणी होईल.
न्या. मकरंद कर्णिक व न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असलेल्यांचा सल्ला घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने चार आठवड्य़ांत ही माहिती सादर करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले. रक्तसंक्रमण हा पॅथोलॉजी विभागाचाच भाग आहे. महाविद्यालयात स्वतंत्र रक्तसंक्रमण विभाग असावा व यासाठी पद असावे, असा कोणताही नियम नाही असे प्रतिज्ञापत्र आरोग्य विभागाने सरकारी वकील कविता सोळुंखे यांच्यामार्फत दाखल केले आहे.
स्वतंत्र विभागाची गरज नाही
रक्तसंक्रमणाचे काम पॅथोलॉजी विभागच करतो. यासाठी स्वतंत्र विभाग व पदाची कोणतीच आवश्यकता नाही, असे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सादर केले आहे. मात्र ही भूमिका तांत्रिक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.


























































