आरोग्यदायी दहीकाला

>>डॉ. दीपक केसरकर, आयुर्वेदतज्ञ 

कृष्ण सवंगड्यांनी आणलेले सर्व खाद्यपदार्थ एकत्र करून त्या प्रत्येकाला तयार झालेला काला वाटत असे. यातून सर्वसमभाव हा पूर्वीपासून आपल्या देशात रुजू असल्याचे जिवंत उदाहरण आहे 

दहीकाला पौष्टिक कसा?

वरील पदार्थांनी तयार केलेला काला शरीराला आवश्यक प्रथिने, कॅल्शियम, लोह, कर्बोदके या सर्वांनी परिपूर्ण असल्यामुळे तो पौष्टिक आहे.  

गोकुळाष्टमीलाच का?

पावसाळ्यात येणारा हा उत्सव आहे. या वातावरणात शरीराला वातामुळे रूक्षपणा येतो आणि पोटाच्या, हाडांच्या तक्रारी चालू होतात. दहीकाल्यातील खाद्यपदार्थ पाहता ते शरीराला स्नेहभाव पोहोचवणारे आणि कोरडेपणा कमी करणारे आहेत. दह्यामध्ये असे काही जिवाणू आहेत जे पचनक्रिया सुरळीत करणारे आणि पोटाचा त्रास कमी करणारे आहेत. पोहे आणि ज्वारीच्या लाह्या शरीरातील कॅल्शियमचा भरणा करून त्या वातावरणात शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.  

कोणते पदार्थ?

गाईचे दूध, दही, लोणी, दडपे पोहे, ज्वारीच्या लाह्या यांचा उपयोग प्रामुख्याने दहीकाला करण्यासाठी केला जातो. आता यात फळेही वापरली जातात. दहीकाला खाणाऱयांनी फक्त हे ध्यानात ठेवावे की, बालगोपाळ दिवसभर गुरांच्या मागे श्रम करायचे आणि दुपारी आपल्या वाट्याला आलेला काला आनंदाने संपवायचे. रोज आपली आई इतक्या श्रमाने आपल्यासाठी काला (भात, डाळ, भाजी, चपाती) बनवते. ती जर आपण आनंदाने संपवली तर आपल्या शरीरात आरोग्यदायी गोकुळ व्हायला वेळ लागणार नाही.  

दूध

कोणत्याही वयोगटात व्यक्तीला सहज पचणारे असे एकमेव आहारीय पदार्थ म्हणजे गाईचे दूध. हे एक उत्तम रसायन म्हणून काम करते. त्यासोबत बुद्धिवर्धक, बळ वाढविणारे, स्तन्य वाढवणारे, भूक तहान यांची शांती करून शरीरातील सात धातूंचे पोषण करणारे आहे.  

पोहे

पोहे मुळात पचायला जड, पण तव्यावर भाजल्यानंतर ते हलके होतात. ते बळ देणारे अवलंभक व कफकारक आहेत.  

ज्वारीच्या लाह्या

पावसाळ्यातील थंडीच्या विरोधात शरीरात उष्णता तयार करणे व शरीराची ताकद भरून काढणे हे कार्य ज्वारीच्या लाह्यांनी होते.  

दही

दही रसाने आंबट, जड, उष्ण स्तंभक, रुचकर आहे. दही शक्यतो दिवसा खावे. ते खाताना खडीसाखर, मध, तूप किंवा मुगाचे वरण यासोबत खावे. दही नेहमी खाऊ नये.