तांदळाच्या पाण्याचे गुणकारी आणि आश्चर्यजनक फायदे

आपण अनेकदा ज्या गोष्टींमध्ये खरे सत्व असते अशा सर्व गोष्टी फेकून देत असतो. याचे एक उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे तांदुळाचे पाणी. वाचून अनेकांना तांदुळाच्या पाण्यामध्ये सत्व असते? असा प्रश्न नक्कीच पडला असेल. आपण अनेकदा तांदुळाचे पाणी निरुपयोगी म्हणून फेकून देत असतो. मात्र तांदुळाचे पाणी खूपच उपयोगी आणि आरोग्यदायी आहे. या पाण्याचे आपल्या त्वचेकरता, केसांकरता आणि शरीराकरता अनेक महत्वाचे फायदे आहे. बाजारातील वेगवेगळ्या महागड्या क्रीम्स, लोशन, तेल, औषधं आपण नेहमीच घेत असतो, मात्र आता तुम्ही तुमच्या काही समस्यांसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर करून बघा. जपान आणि कोरिया सारख्या देशातील महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये तांदळाच्या पाण्याचा समावेश असतो. तांदूळाच्या पाण्यात जीवनसत्व आणि क्षार असल्यामुळे हे पाणी आपल्या सौंदर्यात भर टाकण्यात खूपच मदत करते. हा असा घरगुती उपाय आहे जो आपण अगदी सहजच करू शकतो.

जाणून घ्या तांदुळाच्या पाण्याचे फायदे.
प्रथिने, ट्रायग्लिसराइड्स, लिपीड्स, कर्बोदके , फायटीक अॅसिड, इनोसिटोल, इत्यादी तत्वे आहेत. या सर्व तत्त्वांमुळे केसांना खूपच फायदा होतो. या पाण्याच्या वापराने केस चमकदार, मुलायम, केसांच्या वाढीसाठी, स्प्लीट एंड्स कमी होण्यासाठी, कोंड्यापासून मुक्ततेसाठी आणि केस दाट होण्यासाठी मदत होते. तांदुळाचे पाणी त्वचेसाठी चांगले क्लीन्झर आणि टोनर म्हणून खूप फायदेशीर असते. हे पाणी आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्यापासून चेहऱ्याचे संरक्षण करते. तांदळाचे पाणीकापसामध्ये घेऊन हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावावे आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवा. तांदळाचे पाणी हे चेहऱ्यावर लावल्यास मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होईल शिवाय त्वचेवरील रोमछिद्रांची समस्या कमी होण्यास देखील हे पाणी उपयुक्त असते. तांदळाचे पाणी कोरड्या त्वचेसाठीही रामबाण उपाय आहे. कोरड्या त्वचेवर होणारी जळजळ या पाण्यामुळे कमी होते.सनबर्नचा त्रास कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यास त्वचेला थंडावा मिळेल. तांदळाच्या पाण्यात भरपूर कर्बोदके असतात. ही कर्बोदके शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे आपले शरीर उर्जावान राहते. तसेच आपल्या शरीराला वेगवेगळे संसर्ग होण्यापासून हे पाणी मज्जाव करते. तांदळाच्या पाण्याच्या सततच्या सेवनामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीत होऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. पाचक प्रणाली देखील यामुळे सुधारली जाते. पोटाच्या अनेक समस्यांवर हे पाणी गुणकारी आहे.

तांदळाचे पाणी कसे तयार कराल?
एका भांड्यात तांदूळ आणि त्यापेक्षा दुप्पट पाणी घाला आणि उकळवा. उकळल्यानंतर भांडे मंद आचेवर झाकून ठेवा आणि थोडावेळ पाणी उकळू द्या. यानंतर, एक भात एका चमच्याने बाजूला काढा आणि तो व्यवस्थित शिजला आहे की, नाही ते तपासा. शिजल्यानंतर भात चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या व एका भांड्यात ते पाणी काढून घ्या. हे पाणी केसांवर किंवा त्वचेवर वापरा. हे पाणी प्यायचे असल्यास, त्यात थोडे तूप आणि मीठ घाला आणि नंतर प्या.