
‘11/7’च्या साखळी बॉम्बस्फोटांतील दोषींच्या अपिलांवरील सुनावणीला अखेर गती मिळणार आहे. बॉम्बस्फोट होऊन 18 वर्षे उलटल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात विशेष खंडपीठ स्थापन केले आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे 15 जुलैपासून सुनावणी सुरू होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी शुक्रवारी विशेष खंडपीठाच्या स्थापनेसंबंधी नोटीस जारी केली. या प्रकरणात फाशी झालेल्या एहतेशाम सिद्धीकीने अपिलावर लवकर सुनावणीची विनंती केली आहे. याचदरम्यान विशेष खंडपीठ स्थापन केले आहे. सिद्दिकीचे वकील युग चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे विनंती केली होती. सिद्दिकी 18 वर्षे तुरुंगात असून त्याच्या अपिलावर सुनावणी सुरू झाली नसल्याचे अॅड. चौधरी यांनी निदर्शनास आणले. बॉम्बस्फोटप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सप्टेंबर 2015 मध्ये 12 जणांना दोषी ठरवताना पाच जणांना फाशी, तर इतरांना जन्मठेप सुनावली. त्या शिक्षेविरोधातील दोषींचे अपील प्रलंबित आहे.