
सामना प्रतिनिधी, परभणी
परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड वाढ होत आहे. या उन्हाच्या कडाक्यामुळे परभणी शहरासह जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य होत असून या वाढत्या तापमानाच्या फटक्यामुळे उष्माघाताचे आजार बळावत आहेत. परिणामी परभणीकर हैराण झाले आहेत. त्यात भरीस भर पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर बनत आहे. पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने वेळीच पाणीटंचाईवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तापमानात वाढ होत असल्याने अनेकजण सकाळी 10च्या आत कामे उरकून घेत आहेत. यानंतर घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. रस्त्यावरील वाहने अक्षरश: पोळत आहेत. दुचाकी वाहनावरुन प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे. चारचाकी वाहने वातानुकूलीत सुविधचेचा लाभ घेताना दिसत आहेत. एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच पारा 40 अशांवर गेला आहे. एकंदरच वाढत्या तापमानामुळे पाणीपातळी खोल जात आहे. पाणी संकट डोकेवर काढत आहे.
टंचाईग्रस्त गावांतील 42 हजार 600 ग्रामस्थांना 30 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील अनेक वर्षांच्या तुनलेत यावर्षी पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच ग्रामीण भाग टंचाईने होरपळत असून, या ग्रामस्थांना प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. गाव पातळीवरील जलस्त्रोत आटल्याने पाण्याची टंचाई वाढली आहे. विशेष म्हणजे यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने भूजल पातळी झपाट्याने खोल गेली. परिणामी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीला पालम तालुक्यात सर्वाधिक 8 टँकर सुरू आहेत. या तालुक्यातील 6 गावे आणि दोन वाड्यांमध्ये 13 हजार 265 ग्रामस्थांना टँकरचे पाणी पुरविले जात आहे. त्याखालोखाल पूर्णा तालुक्यातील 3, सेलू तालुक्यातील 6 गावांना प्रत्येकी 6 टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे तर गंगाखेड तालुक्यातील 1, सोनपेठ तालुक्यातील 2 गावांना प्रत्येकी 2 टँकर सुरू झाले आहेत.
सद्यस्थितीला 22 खासगी आणि 8 शासकीय अशा 30 टँकरच्या सहाय्याने 21 गावे व 5 वाडीतांड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच प्रशासनाने एकूण 176 खासगी विहिरीचे अधिग्रहण केले असून, त्यातील 26 विहिरी केवळ टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत तर 150 विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले करण्यात आले आहेत. पालम तालुकातील चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामपूर तांडा, पेंडू खु, सादलापूर, पेंडू बु, बंदरवाडी, पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव, गंगाखेड तालुका : गोदावरी तांडा, उमला नाईक तांडा, सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, कोथळा, सेलू तालुक्यातील तळतुंबा, वालूर, पिंपरी गोंडगे, नागनाठा कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड़ तर जिंतूर तालुक्यातील मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा आदी गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती उग्ररुप धारण करत आहे. परभणी शहरातही पिण्याच्या पाण्याची आवस्था अत्यंत बिकट बनली आहे. एकिकडे मनपा तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे पंधरा दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तापमानाचा पारा 42 अंशावर गेला तरी पाण्याअभावी कुलर्स बंद आहेत.



























































