‘बेड हीटर’ने घात केला नेपाळच्या रिसॉर्टमध्ये, सापडले आठ हिंदुस्थानी पर्यटकांचे मृतदेह

875

नेपाळच्या रिसॉर्टमध्ये हिंदुस्थानातील आठ पर्यटकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पर्यटकांचा बेड हीटरने घात केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केरळमधील हे पर्यटक एका रिसॉर्टमधील खोलीत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना एअरलिफ्ट करून काठमांडू येथील रुग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

केरळमधील 15 जणांचा ग्रुप नेपाळला फिरण्यासाठी आला होता. हे सर्व पर्यटक मकवानपूर जिह्यातील दमन येथे एवरेस्ट पॅनोरमा रिसॉर्टमध्ये थांबले होते. त्यांनी चार खोल्या आरक्षित केल्या होत्या. त्यातील हे आठ जण एकाच खोलीत थांबले होते. रुम गरम करण्यासाठी त्यांनी रात्रभर हिटर चालू ठेवला. त्यात दरवाजा आणि खिडक्या बंद होत्या. त्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रवीण कुमार नायर, शरण्या, रंजीत कुमार, इंदू रंजीत, श्री भद्र, अबिनब सोरया, अबी निसार, आणि वैष्णव रंजीत अशी मृतांची नावे आहेत. नेपाळमधील हिंदुस्थानच्या दूतावासाने या घटनेवर बारीक लक्ष ठेवले आहे. आवश्यक मदत करण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना दिल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या