वादळी वाऱ्यासह पाऊस; लाखोंचे नुकसान

सामना ऑनलाईन । धुळे

मान्सूनपूर्व पावसाने धुळे शहरासह जिह्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावली. शहरासह मुंबई-आग्रा महामार्ग आणि नागपूर-सुरत महामार्गावरील ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अवधान एमआयडीसीत लोखंडाचे शेड, पत्रे उडाले. कुंपणाच्या भिंतीही कोसळल्या. बऱ्याच ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला. वादळानंतर पाकसाच्या सरी कोसळल्याने सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता. यात मात्र प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यंदा तापमानात झालेल्या वाढीमुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागला. फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली होती तर मेमध्ये काही दिवस वगळता महिनाभर तापमान चाळीशीच्या पारच होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वाताकरण असूनही पावसाचे आगमन होत नसल्याने उकाडय़ात वाढ झाली होती. मात्र मंगळवारी दुपारी 15 ते 20 मिनिटे मान्सूनपूर्व पावसाने शहरासह जिह्यात हजेरी लावली. साडेचार वाजेच्या सुमारास हलक्या स्वरूपात वादळ सुरू झाले. जोरदार वादळ आणि त्यापाठोपाठ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. परिणामी शहरातील बहुतांश ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली होती. रस्त्यावरील वर्दळ काही काळ थांबली होती.

वाहतूक विस्कळीत
मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरानजीक असलेल्या सुरत बायपासजवळच नक्याने उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. वादळ जोरात असल्यामुळे या ठिकाणी उभारण्यात येत असलेले उड्डाणपुलाचे लोखंडाच्या सळय़ा वाकल्या. त्या महामार्गावर झुकल्यामुळे महामार्गाकरील वाहतूक काही काळ थांबवावी लागली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

विजेचा पुरवठा खंडित
दुपारी अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या पावसाने सर्वांचीच त्रेधा उडविली असताना विजेचा पुरवठादेखील लागलीच खंडित झाल्याने बत्ती गूल झाली होती. गोंदूर सबस्टेशन बंद पडल्याने देवपूर परिसर, तिसगाव, नगावसह सर्वच ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला. शहरात आणि ग्रामीण भागात विजेचा पुरवठा खंडित झाला होता. विजेचे खांब कोसळले, तारा तुटल्याने वीज वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या