पावसाचा दणका, पण अर्धे संभाजीनगर कोरडेच

23

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

गायब झालेल्या पावसाने आज सोमवारी शहराला दणका दिला खरा, पण हा पाऊस अध्र्या शहरावरच मेहरबान झाल्याने अर्धे शहर कोरडेच राहिले. दरम्यान, आजच्या पावसामुळे परतीच्या पावसाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

जुलै महिन्यात पुनरागमन झालेला पाऊस पुन्हा गायब झाला आहे. सप्टेबर महिना उजाडल्याने आता सर्वांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत, मात्र या पावसाची सुतरामही शक्यता दिसून येत नव्हती. दरम्यान, सोमवारी अचानक दुपारी पावसाने शहराला दणका दिला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पश्चिमेकडून दाखल झालेला धो-धो पाऊस जालना रोड परिसरापर्यंत होता. जालना रोडच्या पलीकडे असलेल्या पूर्व भागातील  बसस्थानक, समर्थनगर, संभाजीपेठ, जालना रोड, सिडको बसस्थानक परिसरात तुरळक पावसाची हजेरी होती तर लेबर कॉलनी, हडको-सिडको, जाधववाडी, नारेगाव, हर्सूल परिसरात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे हा परिसर कोरडाच होता.

दरम्यान, पश्चिम शहराला पावसाने झोडपून काढले. पैठण रोडवरील वसाहती रेल्वेस्टेशन, रमानगर, क्रांतीचौक, जवाहर कॉलनी, गुरुगोविंदसिंगपुरा यासह परिसरातील अनेक रस्त्यांवर तळे साचले होते. सखोल भागात पाणीच पाणी दिसून आले. आज सोमवारी अचानक आलेल्या या पावसाने परतीच्या पावसाच्या अपेक्षा वाढविल्या असून येणार्‍या दिवसात या पावसाने हजेरी न लावल्यास अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या