
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात पावसाचा कहर सुरूच असून मागील आठवडयात झालेल्या अतिवृष्टीनंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या अतिवृष्टीचा शेती, फळबागांना फटका बसण्यासोबतच लोकसहभागातून झालेले बंधारे आणि कट्टे फुटून गेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या विहिरी पाण्यामुळे बुजून गेल्या. तर बाजारवाहेगाव शिवारातील काही बैले, बैलगाडया व शेती उपयोगी अवजारे वाहून गेली. सुखना, लहुकी, दुधना नद्या 12 वर्षांनंतर दुथडी भरून वाहत आहेत. या नदींना 12वर्षानंतर पहिल्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरले आहे.
या नदीकाठच्या शेतीत पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बदनापूर पाचोड रस्तावर नानेगाव येथील पूल वाहून गेल्याने हा रस्ता बंद झाला आहे. बदनापूर तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीत होती. यंदा मात्र निसर्गाने तालुक्यात पावसाने कसर भरून काढण्याचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केल्यामुळे बदनापूर व अंबड तालुक्यातील सीमारेषेवर असलेले व बदनापूर शहराच्या दक्षिणेकडील रोषणगाव, मांजरगाव, धोपटेश्वर, कुसळी, बाजारवाहेगाव, चिकनगाव, नानेगाव, माहेरभायगाव, देशगवव्हान, बदापूर, सायगाव, अवा, अंतरवाला या गावात मागील आठवडयात अतिवृष्टी होऊन मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पेर केलेले सर्व खरीपाचे बियाणे वाहून गेले असतानाच बुधवारी रात्रीपासून ते पहाटेपर्यंत अकोला, निकळक, कंडारी, वाल्हा, रामखेडा आदी गावातही अतिवृष्टी झाली. या भागातील शेतीत प्रचंड पाणी तुंबले आहे.
अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून फळबागा वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नानेगाव येथील लहुकी नदीला मोठा पूर आला असून येथील जुना केटीव्हयर कट्टा भरून प्रचंड पाणी आल्यामुळे पाचोड बदनापूर रस्ता पुलाचे काम निर्माणाधिन असल्याने तात्पुरता असलेला रस्ता वाहून गेल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. या नदीकडच्या शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सुकना, लहुकी, दुधना नदी 12 वर्षानंतर पहिल्यांदा दुधडी भरून वाहिली. नदीकाठच्या गावात पानी घुसल्यामुळे काही वेळ खळबळ उडाली होती. सकाळी पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान या पावसाने झाले आहे. बदनापूर शहरातील हुसेननगर व दुधना नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने येथील अनेक कुटुंबिय उघड्यावर आले आहेत.


























































