
सामना ऑनलाईन । खेड
पाच दिवसांपासून तालूक्यात जोरदार पाऊस झाल्याने खेड शहरालगत वाहणाऱ्या जगाबूडी आणि नारंगी या नद्यांच्या पाणीपातळीत समाधारकारक वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील नद्या नाले, सार्वजनिक पाणवठे दुथडी भरून वाहू लागल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघाला आहे. पडणारा पाऊस लावणी योग्य असल्याने शेतकऱ्यानी लावणीला सुरवात केली आहे.
या वर्षी पावसाने खूपच प्रतीक्षा करायला लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर होत चालला होता. दुबार पेरणीच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, आता पावसाला सुरवात झाली असून शेतकरीही लावणीच्या तयारीला लागले आहेत. पाऊस लांबल्यामुळे तालूक्यात पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर झाला होता.पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठचे दूकानदार आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याचे वृत्त नसले तरी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी भरावाची माती रस्त्यावर आल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. दगड मातीचा पर्यायी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने चालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जगबुडी नदीवरील नव्या पुलाचा भराव खचल्यानंतर याच ठिकाणच्या दगड मातीच्या पर्यायी रस्त्यावर ट्रक मातीत रूतल्याची घटना घडली. त्यामुळे महामार्ग काही काळ वाहतूकीस ठप्प झाला .


























































