कोकणात मान्सूनचे  दमदार आगमन, दुबार पेरणीचे संकट टळले

सामना प्रतिनिधी ।  संगमेश्वर

पेरणी केल्या नंतर पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना आज वरुण राजाने चांगलाच दिलासा दिला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात आज मान्सूनचे दमदार आगमन झाल्याने बळीराजा आनंदीत झाला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर पाणी साठून वाहतूक बंद पडली. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे आगमन गतवर्षीच्या तुलनेत शांततेत झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी सुरु झालेल्या मान्सून पूर्व सरींनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची अनेक ठिकाणी वाताहत झाली होती. प्रत्यक्षात मान्सून सुरु झाल्यानंतर या चौपदरीकरणाच्या कामाचे काय होणार, अशी भिती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. आज पावसाच्या दमदार सरींनी अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठून वाहतूक बंद होण्याचे प्रकार घडले. मुंबई गोवा महामार्गावर सुरक्षेचा उपाय म्हणून ठेकेदार कंपन्यांनी आज आपली आपत्कालीन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती.

आजच्या पावसाने आनंदीत झालेल्या बळीराजाने आपल्यावरील दुबार पेरणीचे संकट टळल्याने समाधान व्यक्त केले. अजून दोन दिवस जर पावसाचे आगमन लांबले असते तर रुजून आलेली रोपे करपण्याची भिती होती. यावर्षी वळवाच्या सरी कोसळण्यास विलंब झाल्याने २५ मे नंतर होणाऱ्या पेरण्या होण्यास जवळपास १० ते १२ दिवस विलंब झाला होता. त्यातच पेरणी नंतर मान्सूनचे आगमन लांबल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता .मात्र आजच्या दमदार पावसाने सर्वांचीच चिंता मिटवली आहे.

आज संगमेश्वर तालुक्यातील देवरुखला मान्सूनने चांगलाच दणका दिला. आज सकाळी ७:३० वाजता  देवरुख परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सुरु झालेल्या पावसाने देवरुखवासीयांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडवली. देवरुख परिसराला सलग चार तास पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे गटारे तुंबून देवरुख शहर, खालची आळी, सह्याद्रीनगर, साडवली आणि कोसूंब तेथील सर्व रस्ते जलमय झाले होते. परिणामी या परिसरातील वाहतूक काही भागात ठप्प तर काही ठिकाणी संथ गतीने सुरु होती. दरम्यान आजच्या पावसामुळे कोठेही नुकसान झाल्याची नोंद तहसील विभागात झाली नव्हती.