
ऐन गणेशोत्सवात कोकणात पाऊस दमदार बरसत आहे. सलग पाचव्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाल्याचा फटका कोकण रेल्वेला बसला असून गौरी गणपतीला गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे.
गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 124.33 मिमी पाऊस पडला.मंडणगड 120 मिमी, दापोली 180 मिमि, खेड 142 मिमि, गुहागर 90 मिमी, चिपळूण 165 मिमि, संगमेश्वर 124 मिमी, रत्नागिरी 69 मिमी,लांजा 130 मिमी आणि राजापूर तालुक्यात 99 मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवारीही रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी एक्सप्रेस, मंगलोर-मुंबई एक्सप्रेस या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री 12 वाजून 5मिनिटांनी सुटणारी दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस तब्बल 14 तास उशीराने सुटली. ही गाडी गुरुवारी दुपारी दोन वाजता दादरहून सुटली. त्यामुळे गौरीगणपतीला गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला.परतीची सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता सावंतवाडीवरून सुटणार आहे. सावंतवाडी-छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी साडेचार वाजता सुटली तर रद्द करण्यात आलेली सावंतवाडी – छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी साडेपाच वाजता सोडण्यात आली आहे.



























































