
लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यातील तब्बल 36 महसूल मंडळामध्ये, तर दहा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे येरोळसह परिसरातीलही दोनदिवस जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून शेत शिवारातही पाणी गेल्याने शेताला अक्षरश: तळ्याचे स्वरूप आले आहे.
दोन दिवस सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे येरोळ येथील चंद्रकांत साकोळकर, रावसाहेब पाटील यांच्यासह अनेकांच्या घरात पाणी शिरले. रस्त्यावरील पाणी घरात शिरल्याने घरातील अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. आणि घरात पाणी शिरल्याने परिणामी रात्र जागून काढावी लागली.
शेत शिवारातील काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून या भागातील शेतकऱ्यांना शेतीचे ऐवढे मोठे नुकसान पहिल्यांदाच पाहावे लागल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.आता वर्षभर कुंटुबाचा खर्च कशाने भागवायचा असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असल्याचे शेतकरी मदन तांबोळकर, गंगाधर साकोळकर,बालाजी महाराज,दिपक चोचंडे यांनी दैनिक सामनाशी बोलून दाखवले.
पांढरवाडी तलावाच्या साडव्यावरुन प्रचंड पाणी वाहिले. त्यामुळे धरणाखालील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने ऊस, सोयाबीन पिके भुईसपाट झाली . शेतातील स्पि़कलर पाईप, ठिबक, शेती साहित्य मोठ्या प्रमाणात वाहून गेले. प्रशासनाने पाहाणी करुन तात्काळ आर्थिक मदत करावी आशी शेतकरी मदन तांबोळकर,हरि गंभिरे, भिमाशंकर तांबोळकर,वसंत पाटील,राजेश्ववर एरंडे यांच्या सह शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे.