
पावसाच्या कहराने उत्तर हिंदुस्थान पुराच्या तडाख्यात सापडलेला असताना आता मध्य प्रदेश राज्यातील जनतेवर आभाळ फाटल्यासारखा पाऊस बरसला आहे. राज्यात पावसाने आतापर्यंत 8 जणांचा बळी घेतला असून हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.नर्मदेसह अन्य नद्या उफानावर असल्याने राज्यातील 12 जिल्ह्यांतील 454 गावे रिकामी करत नागरिकांना बचाव शिबिरांत हलवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिली. गेल्या 2 दिवसात पुराच्या वेढ्यातून 7 हजार नागरिकांना वाचवून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आता 40 गावातील 1200 नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याची मोहीम एनडीआरएफ आणि लष्करी हेलिकॉप्टर्सच्या मदतीने सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
जोरदार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यात 8 जण ठार झाले आहेत. त्यातील काही भिंती कोसळून तर काही ओसंडून वाहणाऱ्य़ा नाल्यांच्या पाण्यात वाहून गेल्याने मरण पावले आहेत. राज्याची पूरस्थिती गंभीर असून त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आपण मदतीसाठी बोललो आहे असेही मुख्यमंत्री चौहान यांनी स्पष्ट केले.
लष्कराने 9300 नागरिकांना वाचवले
जोरदार पुरामुळे मध्यप्रदेशातील 454 गावे पाण्याने वेढली गेली आहेत. या संकटाचा राज्य सरकार लष्करी पातळीवर सामना करीत आहे.पुरात अडकलेल्या सुमारे 9,300 नागरिकांना लष्कराची हेलिकॉप्टर्स आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाच्या (एनडीआरएफ) सुरक्षित स्थळी हलवले आहे. या पूरग्रस्तांना 170 बचाव शिबिरांत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. आता 40 गावांतील 1200 नागरिकांना पुरातून बाहेर काढून बचाव शिबिरात नेण्याचे काम जोरात सुरू आहे. राज्यातील इंदूर, उज्जैन, शाजापूर, रतलाम, देवास, झाबुआ, अलिराजपूर, मंदसौर आणि नीमच या भागात येत्या 24 तासांत जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज राष्ट्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. या पुराचा आणि पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम मध्य प्रदेशला बसल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले.
























































