शाळेतील पटसंख्या संचमान्यतेसाठी 31 ऑक्टोबरची तारीख ग्राह्य धरा, शिवसेनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शाळांमधील नियमित हजेरी तसेच अभिलेख व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. अनेक शाळा अजून बंद असून काहींचे अभिलेख पावसामुळे भिजले आहेत. त्यामुळे शाळेतील पटसंख्या संचमान्यतेसाठी 30 सप्टेंबर ऐवजी 31 ऑक्टोबरची तारीख ग्राह्य धरावी, अशी मागणी शिवसेनेने शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील अनेक जिह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले आहे. तर अनेक शाळा काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे शाळेतील पटसंख्या संचमान्यतेसाठी 30 सप्टेंबर ऐवजी 31 ऑक्टोबरची तारीख ग्राह्य धरावी, अशी मागणी करत शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षणमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. यू-डायस प्लस या पोर्टलवर शाळांची माहिती भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. इंटरनेटची अनुपलब्धता, शाळांचे अभिलेख भिजल्यामुळे झालेल्या अडथळ्यांमुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे संबंधित माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. शाळांची मान्यता, अनुदान, शिक्षक संख्या आणि सेवासुरक्षा या सर्व गोष्टी पटसंख्येवर अवलंबून असल्याने, चुकीची आकडेवारी शैक्षणिक व्यवस्थेवर विपरित परिणाम करू शकते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवासुरक्षेसाठी 31 ऑक्टोबर ही तारीख पटसंख्या नोंदणीसाठी ग्राह्य धरावी, अशी मागणी आमदार अभ्यंकर यांनी केली आहे.