अतिवृष्टीने मराठवाडा उद्ध्वस्त…  12 लाख हेक्टरचा चिखल झाला, दोन दिवसांत 12 जणांचा मृत्यू

दोन दिवसांपासून मराठवाड्यावर आभाळ फाटले आहे. अतिवृष्टीने मराठवाडा उद्ध्वस्त  झाला असून 12 लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. अतिवृष्टीमुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. दोन दिवसांत 12 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल दीड हजार गावांना पावसाचा तडाखा बसला आहे.

गेल्या 48 तासांपासून मराठवाड्यात पावसाने संततधार लावली आहे. नांदेड, परभणी तसेच हिंगोली जिल्ह्यातील लहानमोठे प्रकल्प ओसंडून वाहत असून नदी-नाले उफाणले आहेत. पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले असून शेतशिवाराचा चिखल झाला आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात जवळपास पाच लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, मूग, उडदाचा चिखल झाला आहे. परभणी, हिंगोलीतही अशीच परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिवमध्येही पावसाने हाहाकार उडाला असून शिवारातील उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात मिळून जवळपास 11 लाख हेक्टरवरील खरीपाच्या पिकांची अतिवृष्टीने माती केली आहे. सहा लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मराठवाड्यात पावसाने ठाण मांडल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून दोन दिवसांच्या पावसात 12 जणांचा मृत्यू झाला. मराठवाड्यातील दीड हजार गावे पावसाने बाधित झाली असून 169 जनावरे दगावली आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून सखल भागातील घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे.

कर्नाटकच्या चुकीची शिक्षा औरादकरांना

मांजरा आणि तेरणा नद्यांचा संगम औराद शहाजनीच्या जवळ होतो. दरवर्षी येथे पावसाळ्यात पूरस्थिती असते. मांजरा नदीवर कर्नाटकात कोगळी येथे बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा ओसंडून वाहत असतानाही कर्नाटक सरकारने केवळ दोनच दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे मांजरा नदीचे पात्र मागच्या बाजूने फुगले आणि औराद शहाजनी शिवारातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचा चिखल झाला.