
सोमवारपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसाचा जोर 15 ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी संततधार पावसाची शक्यता आहे. राज्यासह मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या तीनही दिवसात 100 मिमीहून अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा मुक्काम असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भातही बहुतेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
























































