मुंबई आणि परिसरात मुसळधार; मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टी, मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात बुधवार सकाळपासून दमदार पाऊस होत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि परिसरात बुधवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागा पाणी साचले होते. तर ठाणे आणि परिसरातही मुसळधार पाऊस होत आहे.

मुंबई परिसरात गेल्या 24 तासात 97 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरामध्येही मुसळधार पाऊस झाला. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास अर्ध्या तासामध्ये वांद्रेमध्ये 63, महालक्ष्मीमध्ये 21, राम मंदिरमध्ये 21 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील 24 तासातही मुंबई, ठाणे कोकण किनारपट्टी, रायगड, रत्नागिरी परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील 24 तासांसाठी रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या