राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचे, मुंबईसह ठाणे, पालघरला आज ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबईसह राज्यभरात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघरला गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असताना आता पुढील चार ते पाच दिवस पावसाचे स्वरूप आणखी तीव्र होणार आहे. बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे. कोकणतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडय़ात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

समुद्राला मोठी भरती

उद्या 24 जुलैपासून सलग चार दिवस समुद्र भरतीमुळे खवळणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावर गेल्यास धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये 26 जुलै रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीचे लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकर-पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.