नगर शहरासह उपनगरात शुक्रवारी रात्रभर झालेल्या तुफान पावसाने सीना नदीला पूर आला. त्यामुळे नगर-कल्याण रस्त्यावरील सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहिल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच महापालिका प्रशासनाला सूचना केल्या.
नगर शहर व जिह्याच्या ग्रामीण भागात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाला. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली होती. काल (शुक्रवारी) जिह्यात हवामान खात्याने पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. नगर शहर व परिसरात शुक्रवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची रिमझीम सुरू होती. सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीच्या सुमारास शहर व उपनगरात जोरदार पाऊस पडला. पहाटेपर्यंत हा पाऊस पडत होता. या पावसामुळे सीना नदीला पूर आला. त्यामुळे कल्याण रस्त्यावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. पूल पाण्याखाली गेल्याने कल्याण रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक पहाटे चार वाजल्यापासून ठप्प झाली होती.
कल्याण रस्त्यावरील उपनगर, तसेच ग्रामीण भागातून शिक्षणासाठी नगरला येणारे विद्यार्थी, दूध उत्पादक, भाजी विक्रेते शेतकरी, नोकरदार यांची गैरसोय झाली होती. सीना नदीच्या पुलावरील पूर ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान, आज दुपारपासून शहर व उपनगरात पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला.
शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शहरातील नरहरीनगर, गुलमोहर रोड येथील रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जोरदार पावसामुळे रस्ते जलमय होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठय़ा समस्यांचा सामना करावा लागला. याची माहिती खासदार नीलेश लंके यांना मिळताच मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी या भागास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तत्काळ आपत्तिव्यवस्थापन पथकाला आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱयांना बोलावून सूचना केल्या.
खरीप पिकांचे नुकसान
मागील तीन दिवसांच्या पावसाने हजारो हेक्टरचे नुकसान झाले आहे. रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिह्यातील एक हजार 170 हेक्टर क्षेत्रावरील कापूस, मूग, बाजरी या खरीप पिकांचे, तसेच उसाचे नुकसान झाले आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील सर्वाधिक एक हजार 135 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
जामखेडमध्ये ओढय़ा-नाल्यांना पूर
शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत परिसरातील नदी व ओढय़ा-नाल्यांनी रौद्ररूप धारण केले होते. यामुळे अनेक वाडय़ा-वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. साकत-कोल्हेवाडी-कडभनवाडी यांना जोडणारा लेंडी नदीवरील पूल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला. यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला होता. सकाळी सातनंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू झाली. शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोजच प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी व परिसरातील पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
महाबळेश्वरात पावसाने 200 इंचांचा टप्पा ओलांडला
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाबळेश्वर येथे पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेले काही दिवस येथे पावसाची संततधार सुरू आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांत येथे 80 मि.मी., तर एकूण 5126 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने 200 इंचांचा टप्पा लवकर पूर्ण केला आहे. महाबळेश्वर हे पावसाचे आगार म्हणून ओळखले जाते.
उन्हाळी हंगामाप्रमाणेच वर्षासहलीसाठी येथे पर्यटक मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. येथे दरवर्षी साधारण 225 ते 250 इंच पावसाची नोंद होते. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या प्रारंभीच वेण्णा तलाव तुडुंब भरला. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला होता. पुन्हा ऊन-पावसाच्या खेळानंतर जुलैअखेरीस पावसाने पुन्हा जोर धरला. 20 जुलैपासून तालुक्यात अतिवृष्टी सुरू झाली; परंतु सुदैवाने कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली नाही. ऑगस्टच्या प्रारंभी पावसाचा जोर होता. ऑगस्टच्या दोन आठवडय़ांतच पावसाने 190 इंचांचा टप्पा पार केला होता. आता सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वरात 200 इंचांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.