
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात तुफान पाऊस सुरू असून या पावसाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराला अक्षरशः झोडपून काढले. संपूर्ण शहर बुडाले. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. वाहने अडकून पडली. रेल्वे स्थानकही पाण्याखाली गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या पावसाने महापालिकेच्या कामांची पोलखोल केली. बचाव कार्यासाठी आणि शहरातील पाणी उपसण्यासाठी महापालिका आणि अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
नागपूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 आणि 2 वर पाणी साचले असून चिखल आणि गुडघाभर पाण्यातून त्यांना वाट काढावी लागत आहे. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने अनेक रेल्वे गाडय़ांचे मार्ग बदलावे लागले तर अनेक गाडय़ा विलंबाने धावत होत्या. स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. संपूर्ण शहर पाण्याखाली गेल्याने नागपूर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांची मोठी कसरत झाली. सदिच्छा कॉलनीजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसले.
रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
पडोळे चौक ते राधे मंगलम कार्यालयादरम्यान रिंग रोडची एक बाजू पुर्णपणे पाण्याखाली गेली. त्यामुळे या बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. अनेक वर्षांपासून या भागात पाणी साचण्याची समस्या कायम असूनही आणि वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच कोटय़वधी रुपयांचा खर्च करूनही उभारण्यात आलेला कंप हाऊस सुरू आहे की नाही असा सवाल नागरिकांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून शहरातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांना होडीतून सुरक्षित स्थळी पोहोचवले
सखल भागात म्हणजेच विशेषतः मानकापूर, बुटीबोरी आणि इतर उपनगरांमध्ये तर नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागला. या होडीच्या माध्यमातून बचावकार्य सुरू होते. दरम्यान, हवामान विभागाने नागपूरसाठी रेड अलर्ट जारी केला असून शहरात आतापर्यंत तब्बल 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.