रत्नागिरीला पावसाने झोडपले; दरडी, संरक्षक भिंती कोसळल्या, शेतात पाणी शिरून नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाचा कहर रविवारी दिवसभर सुरू होता. चिपळूणात वीज पडून घरांचे नुकसान झाले. गणपतीपुळय़ात शेतात पाणी शिरून नुकसान झाले. उक्षी येथे नवीन बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. वरवडे येथे दरड कोसळून नुकसान झाले.

जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 54.44  मिमी तर एकूण 490 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 45.30 मिमी, दापोली 16.40 मिमी, खेड 59.40 गुहागर 52.30 मिमी, चिपळूण 32.30 मिमी, संगमेश्वर 57.10 मिमी,  रत्नागिरी 104.60 मिमी, राजापूर 61.00 मिमी, लांजा 61.60 मिमी. पाऊस पडला. मंडणगड तालुक्यात मौजे दोणारी-वडवली रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद होता. सा.बां. विभागाने दरड हटवून रस्ता सुरळीत केला.

रत्नागिरीत आज आणि उद्या रेड अॅलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवार 14 आणि मंगळवारी 15 जून रोजी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिह्याला भारतीय हवामान खात्याने रेड अॅलर्ट जाहीर केला आहे. शनिवारपासून जिह्यात अतिवृष्टी सुरू आहे.

कुडाळसह सिंधुदुर्गात दमदार पाऊस

कुडाळ – कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हाभरात रविवारीही पावसाची संततधार सुरूच होती. दिवसभर सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार असलेल्या या पावसाने नदी, नाल्यांचे प्रवाह चांगल्याप्रकारे प्रवाहित झाले आहेत. ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. भात पेरणीसह अन्य कामे ग्रामीण भागात जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

लोणावळा हाऊसफुल्ल

शनिवार व रविवार वीकएंडमुळे लोणावळ्यात मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. पर्यटक लोणावळ्यात आल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.