
सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर
जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्याला पावसाच्या ‘कोसळधारां’नी सलग तिसर्या दिवशी झोडपून काढले. पावसाने संततधार धरत हवामान खात्याने दिलेल्या ‘अतिवृष्टी’ च्या इशार्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरल्याने या धरणाचे स्वयंचलित दरवाजे तीन फुटांनी उचलले गेले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीचे आधीच पात्राबाहेर आलेले पाणी आणखी वाढून तालुक्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीची पातळीही ३८.९ फुटांवर गेल्याने पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे.
तालुक्यातील शिरढोण-नांदणी पुलावर पाणी आल्याने हा मार्ग मंगळवारीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून बुधवारी धरणगुत्ती-शिरोळ मार्गावरही पाणी आल्याने येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावरील नवीन बायपास रस्त्यावर अंकली टोलनाक्यानजीक कृष्णा नदीचे पाणी आल्याने या मार्गावरही वाहतुकीस मज्जाव करण्यात आला. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडल्याने जयसिंगपूर ते अंकली पूल येथे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. उदगाव येथे तर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
राधानगरी धरण मंगळवारी रात्री भरल्यानंतर बुधवारी सकाळ पासून क्रमांक ३, ५ व ६ असे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून प्रतिसेकंद ४२८४ तर वीज निर्मितीसाठी १४०० असे प्रतिसेकंद ५६८४ घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पंचगंगा नदीने ३९ फुटांची इशारा पातळी ओलांडत धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. कोयना धरणातही एका रात्रीत तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा वाढल्याने या धरणाचेही दरवाजे येत्या दोन -तीन दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. त्यातच कर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे या धरणाच्या बॅकवॉटरचा फटका शिरोळ तालुक्याला बसू शकतो.
शिरोळ तालुक्यातील कृष्णा व पंचगंगा नद्यांवरील विविध बंधारे व पुलानजीक पाणीपातळी शिरोळ- ५४.६ फूट, नृसिंहवाडी- ५४ फूट, अंकली पूल-३८.९ फूट, राजापूर-४१.६ फूट, तेरवाड- ५७.६ फूट अशी आहे. दरम्यान, तहसीलदार गजानन गुरव, नायब तहसीलदार जे. वाय. दिवे यांच्यासह पूरनियंत्रण कक्षाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी यांना दक्षतेच्या सूचना दिल्याचे कक्षाचे लिपीक अजित कुरणे यांनी सांगितले.




























































