
शुक्रवारी (05 ऑगस्ट 2025) सकाळपासूनच जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने सायंकाळनंतर अनेक भागांत रौद्ररूप धारण केले. ठाणे, पालघरकरांना तर अक्षरशः झोडपले असून हवामान खात्याने या दोन्ही जिह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे जिह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. पावसाचे हे थैमान असेच सुरू राहिल्यास पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यातच हवामान विभागाने आज सायंकाळी ठाणे आणि पालघर या दोन जिह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्याने ठाणे जिह्यात अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.
‘या’ जिह्यांना यलो अलर्ट
मुंबई शहर, बीड, धाराशीव, रत्नागिरी, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग या जिह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणा सतर्क केली आहे.































































