कोल्हापुरात पावसाची पुन्हा संततधार, घाट भागात अतिवृष्टीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा एकदा संततधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान खात्याने आज व उद्या जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवडय़ांत महापुराने दैना उडवली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विदर्भासह काही जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोकणसह कोल्हापूर, सांगली, सातारा अशा काही जिल्ह्यांत हवामान विभागाने दोन दिवसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे जिल्हा ओलाचिंब झाला असून, वातावरणात गारठा निर्माण झाला होता. जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 43.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.