तुफान आलंया, मान्सूनपूर्व पावसाने मुंबईची दाणादाण

14

सामना प्रतिनिधी । मुंबई

सोसाटय़ाचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वरुणराजा आज मुंबईत पोहचला. मुंबई उपनगर आणि शेजारच्या ठाण्याची त्याने जोरदार धुलाई केली. मात्र या पावसाने भांडुप येथे आनंदाला गालबोट लागले. तिथे पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा बळी गेला.

मुंबईतील मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, शीव, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस जोरदार कोसळला पण शहर मात्र कोरडेच राहिले. डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाडलाही पावसाने चिंब करून टाकले. महाबळेश्वरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. तेथील वेण्णालेकला पूरच आला.

भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने तिघे दगावले
भांडुपमध्ये दोन दुर्घटनांमध्ये तीन जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. भांडुप पश्चिम, खिंडीपाडा, राजारामवाडी येथे सहारा शेख (९) या चिमुरडीला विजेचा धक्का बसला. तिला वाचवण्यासाठी अनिल यादव (३२) या तरुणाने धाव घेतली, मात्र त्यालाही विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. भांडुप पूर्व येथील शिवकृपा नगरातील त्रिमूर्ती निवास येथेही विजेच्या धक्क्याने १० वर्षीय ओम् आप्पा फडतरे याचा मृत्यू झाला. मालाड-मालवणी गेट नंबर ६ जवळील उघडय़ा नाल्यामध्ये पडलेल्या दोन मुलांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले.

– रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम
– सायंकाळी सातनंतर पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रफिक जाम; अनेक ठिकाणी दुचाकी घसरल्या
– पश्चिम रेल्वेवर स्पार्क होऊन इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाल्याने भाईंदर आणि विरारदरम्यानची रेल्वे वाहतूक काही वेळ ठप्प.
– अर्ध्या तासाच्या खोळंब्यामुळे लोकलच्या चार ते पाच सेवा रद्द, तर अनेक लोकल विलंबाने.
– विजांचा कडकडाट आणि प्रतिकूल हवामानामुळे विमानसेवा सुमारे ४५ मिनिटे उशिरा; तीन विमानांचे मार्ग बदलले.

आपली प्रतिक्रिया द्या