
सामना ऑनलाईन, नाशिक
सोमवारच्या संततधार पावसामुळे नाशिक बाजार समितीतील कोथिंबिरीची आवक ५६ टक्क्यांनी घटली असून, एकाच दिवसात २० रुपयांची वाढ होऊन जुडीचा भाव ५० रुपयांवर पोहचला. इतर पालेभाज्यांचे दरही जुडीमागे २ ते ९ रुपयांनी वधारले आहेत.
पावसामुळे शेतातच पालेभाज्या सडण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणणे टाळले. परिणामी, नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीची आवक शनिवारी ७२ हजार जुडय़ा, तर आज ३२ हजार जुडय़ा होती. शनिवारच्या तुलनेत कमाल दर २० रुपयांनी वाढला, आज किमान १२, कमाल ५० व सरासरी ३२ रुपये असे दर मिळाले. मेथीची आवक १८ टक्क्यांनी कमी आली असून, भाव किमान १८, कमाल ३८, सरासरी २६ असे पुकारले गेले. मेथीचा किमान दर आठने, सरासरी व कमाल दर दोन रुपयांनी वाढला आहे. शेपूची आवक ७ हजार ३०० वरून ४ हजार ६०० जुडय़ा इतकी घसरली. कमाल भावात ७ रुपयांची वाढ झाली, दर किमान- १५, कमाल- २५, सरासरी २० असे मिळाले. पालकची आवक एक हजार जुडय़ा, दर किमान- २, कमाल- ४, सरासरी- ३ असे स्थिर राहिले.
फळभाज्याही महागल्या
- नाशिकमध्ये आज टोमॅटो, फ्लॉवर, घेवडा आणि भेंडी यांची आवक सुमारे २० ते २५ टक्क्यांनी घटली.
- टोमॅटोचा कमाल दर १९, सरासरी दर ८ रुपये होता, यात अनुक्रमे एक व सात रुपयांनी वाढ झाली आहे.
- घेवडय़ाच्या सरासरी भावात वीसने वाढ होऊन तो ९० रुपये किलो असा मिळाला.
- भेंडीचा भाव पाच रुपयांनी, गिलके, कोबी चार रुपयांनी, तर शिमला मिरचीचा भाव तीन रुपयांनी वधारला.
किलोचे कमाल व सरासरी दर पुढीलप्रमाणे
- घेवडा- १००-९०,
- दोडका- ५८-४५,
- शिमला मिरची- ५६-४३,
- कारले- ३१-२४,
- वांगी- ३०-२२.५०,
- टोमॅटो- १९-८,
- कोबी- १२.५०-९.५०.




























































