मालवणात झाड कोसळून घर जमीनदोस्त, ४ जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित खोत, मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री रौद्र रूप धारण केले. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण शहरातील बांगीवाडा भागात भंगार व्यावसायिक रहात असलेल्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने घर जमीनदोस्त झाले. यात ४ जण जखमी झाले असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

शहरातील बांगीवाडा भागात भंगार व्यावसायिक राफातुल्ला खान यांच्या २५३४ – बी या घरात गेली अनेक वर्षे भंगार व्यावसायिक राहतात. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ९ जण झोपण्याच्या तयारीत असताना झाड घरावरच कोसळले. लागलीच सर्व सदस्यांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र घराचे छप्पर अंगावर कोसळून इम्रान खान याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर अंगद शर्मा, रामराज शर्मा, आबीद अली व एक छोटा मुलगा इरशाद खान यांना दुखापत झाली.

गंभीर दुखापत झालेल्या इम्रान खान याच्यावर मालवण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरमालक रफातुला खान यांच्यासह घरातील अन्य सदस्य अब्दुल रहीम खान, बाबुल्ला खान, शहानवाज शेख तसेच सईद बांगी, सना शेख यांनी मध्यरात्री भर पावसात जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घर कोसळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर घरातील साहित्याचेही नुकसान झाले आहे.