सिंधुदुर्गात धुवांधार तर रत्नागिरीत संततधार! घरांची छपरे उडाली, भात लावणीलाही वेग

462

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वैभववाडी, कुडाळ तालुक्यांत तर तो धवांधार बरसत आहे. कणकवली, देवगडमधील नद्यानाले दुथडी भरून वाहत असून रत्नागिरीत मात्र थोडा जोर कमी असून दिवसभर पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी, गुहागर, राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासात सरासरी 45 मिमी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते.

शनिवारी सकाळपासूनच वैभववाडी तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दिवसभर धो-धो पाऊस कोसळत असल्याने भात लावणीला जोरदार वेग आला आहे. भुईबावडा व करुळ घाट मार्ग मात्र सुरक्षित आहेत. तालुक्यात सलग दोन दिवस धुवाधार पाऊस कोसळत आहे.

देवगड व आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारी रात्रीपासून सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी दुपारी 12 वाजल्यानंतर या मुसळधार पावसाचा फटका आनंदवाडी येथील काही घरांना बसला. इथल्या घरांची कौले, छपराचे पत्रे उडून हजारो रुपयांचे नुकसान झाले. यात नंदकिशोर कोयंडे, प्रकाश येरम, हनुमंत पुबल यांच्या घराची कौले व पत्रे उडून नुकसान झाले आहे. मात्र या घरांवर गावकऱयांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक कागद टापून पावसाचा बंदोबस्त केला आहे.

कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर सलग दुसऱ्या दिवशी तसाच असल्याने तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचले होते. वेताळबांबर्डे हातेरी व कुडाळ भंगसाळ नद्दय़ा ओसंडून वाहत होत्या. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात नदीचे पाणी शिरले आहे. वेताळबांबर्डे तेलीवाडी येथील चार घरांना पाण्याने वेढा बसला असून कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील घरांनाही पाण्याने वेढले आहे. पणदूर, वेताळबांबर्डे, पावशी, पुडाळ, कविलकाटे, बांव, बांबुळी, चेंदवण या भागातील शेती सतत दोन दिवस पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

राजापुरात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
दिवसभर कोसळणाऱया संततधार पावसामुळे राजापूरातील अर्जुना आणि कोदवली नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजापूरातील चिचंबांध परिसर जलमय झाला आहे.चिपळूण शहरालाही पावसाने झोडपले. आज परशुराम नगर येथील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. मामा नरलकर,अरविंद नरलकर… सुनीता नरलकर, किर्दवकर,,तासे, राजन मेहता यांच्या घरामध्ये पाणी शिरले. यावेळी नगर परिषद सफाई कामगारांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन साफसफाई केली.

दोन दिवसांत 390 मिलिमीटर पाऊस
मालवणात शनिवारी सकाळी काहीशी उसंत घेतलेला पाऊस दुपारनंतर मुसळधार बरसला. संततधार कोसळणाया पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. दोन दिवसांत 390 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आचरा हिर्लेवाडी येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले. चिंदर गावठणवडी येथे दत्ताराम कदम यांच्या घराचा काही भाग कोसळला आहे. नुकसानीची नोंद तालुका आपत्ती विभागाकडे करण्यात आली आहे. अन्य काही ठिकाणीही पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या