
सामना प्रतिनिधी । नांदेड
हदगाव / हिमायतनगरचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या मतदारसंघात असलेला दुष्काळ दूर व्हावा आणि या भागात पाऊस पडावा म्हणून २१ जुलैपासून सुरु केलेल्या पर्जन्यवृष्टी यज्ञाची फलशृती झाली असून, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हदगाव-हिमायतनगरसह परिसरात जोरदार वृष्टी झाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे आजच आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही वाढदिवस आहे.
धार्मिक प्रवृत्ती आणि सामाजिक भावनेतून कार्य करणारे हदगाव-हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकाचवेळी हदगाव व हिमायतनगर येथे पर्जन्यवृष्टी महारुद्र स्वाहाकार महायज्ञ दि.२१ जुलै रोजी सुरु केला. गेल्या पाच दिवसात जवळपास दोन्ही ठिकाणी मिळून तीन हजार जोडप्यांनी या यज्ञात सहभाग नोंदविला.
हदगाव येथे दत्तबर्डी संस्थान तर हिमायतनगर येथे श्री परमेश्वर मंदिरात हा महायज्ञ सुरु करण्यात आला. परिसरात पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत आहे, गेल्या अनेक वर्षापासून अनियमित पावसामुळे त्रस्त झालेल्या बळीराजाला न्याय मिळू दे आणि जोरात पर्जन्यवृष्टी होऊ दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात येत होती. संत महंतांच्या उपस्थितीत वैदीक ब्राह्मणांनी मंत्रोच्चार करीत या महायज्ञाला प्रारंभ केला. दररोज जवळपास दोन्ही ठिकाणी पाच हजार भाविकांची भोजनाची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था आणि जोडप्यांना आहेर करुन या यज्ञाला आज पूर्णाहुती देण्यात आली. यज्ञ सुरु असतानाच काल सायंकाळी काही भागात तर परवा म्हणजे २५ जुलै रोजी काही भागात पाऊस झाल्याने आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी समाधान व्यक्त केले.
दत्त माऊली आणि श्री परमेश्वर बळीराजासाठी धावून आले आणि या यज्ञाची खऱ्याअर्थाने सार्थकता झाली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या यज्ञसामुग्रीमध्ये बारा वेगवेगळ्या गावांचे पाणी, त्रिवेणी संगमाचे पाणी यासाठी आणण्यात आले होते.
हिमायतनगरवासी सांगतात की, १९८८ नंतर आता २०१९ ला अशा यज्ञाचे आयोजन आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वतीने करण्यात आले. १९८८ ला देखील अशीच अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळीही असा महायज्ञ करण्यात आला होता. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नामवंत ब्राह्मण मंडळींना या आहूतीसाठी व यज्ञासाठी पाचारण करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा पर्जन्ययाग यज्ञ यशस्वी झाल्याचे समाधान या परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते. आजपासूनच या परिसरात व मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक लक्ष वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला असून, त्याचाही शुभारंभ आज करण्यात आला.


























































