
सोमवार व मंगळावर अशा सलग दोन दिवस पाथर्डी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील डमाळवाडी येथे राजू पटेल या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला तर शहरातील इंदिरा नगर विभागातील नवनाथ पंडित यांच्या राहत्या घरावरील पत्रे खाली पडून संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. गेली दोन दिवस शहरासह तालुक्यात मोठा पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकाचे शेतकऱ्यांनी वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले आहेत.
तालुक्यातील शिरसाठवाडी येथील तलाव या पावसाने पूर्णपणे भरला असून तालुक्यातील अनेक नद्या, नाले, ओढे यांना पूर आला आहे. पालिकेने तीर्थक्षेत्र विकास योजनेतून कसबा विभागात कोट्यवधी रुपयांची कामे केली मात्र तपनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलाची उंची कमी ठेवल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली तर या ठिकाणी असलेल्या कुस्त्यांसाठी बनवलेला आखाडा पाण्याखाली गेला. कोरडगाव रोड लगत चालू असलेल्या पुलाशेजारील कच्चा रस्ता वाहून गेला तर या ठिकाणी जमा झालेले पाणी स्मशानभूमीत गेले. संत वामनभाऊ नगर मधील एका वीजरोहित्रावर आज वीज पडल्याने काही काळ शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. आज सकाळीच पावसाला सुरुवात झाल्याने अनेक शैक्षणिक संस्थांनी सुट्टी जाहीर केली.



























































