
अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नगर जिल्ह्यातील सुमारे पावणेसहा लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मदन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असून प्रशासनाने स्थानिक पातळीवरचा अहवाल तयार केला आहे.
या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके वाया गेली. पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चार लाख 54 हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. जवळपास जिल्ह्यात 175 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 135 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मिळाले होते. त्यातून तब्बल दोन लाख 49 हजार शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 296 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. या निधीचे वाटप सुरू करण्यात आले असून आतापर्यंत या निधीतून तीन लाख 34 हजार 588 शेतकऱ्यांना मदत देणे शक्य झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या पावणे सहा लाख झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यात मदत मिळालेली तालुकानिहाय शेतकरी
दुसऱ्या टप्प्यात नगर तालुक्यातील 8 हजार 329 , अकोले तालुक्यातील 12 हजार 906, जामखेड तालुक्यातील 4 हजार 911, कर्जत तालुक्यातील 23 हजार 574, कोपरगाव तालुक्यातील 23 हजार 796 , नेवासा तालुक्यातील 37 हजार 972, पारनेर तालुक्यातील 19 हजार 423, पाथर्डी तालुक्यातील 38 हजार 162, राहुरी तालुक्यातील 29 हजार 906, संगमनेर तालुक्यातील 29 हजार 938, शेवगाव तालुक्यातील 35 हजार 943, श्रीगोंदा तालुक्यातील 35 हजार 249, श्रीरामपूर तालुक्यातील 18 हजार 138, राहता तालुक्यातील 16हजार 341 शेतकऱ्यांना मदत देणे शक्य झाले आहे.



























































