
पोलिसांच्या संगनमताने गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्याने सरकारचे धाबे दणाणले असून यापुढे स्थानिक गुन्हे शाखांमध्ये (क्राईम ब्रँच) स्वच्छ चारित्र्याच्या क्लीन पोलिसांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या नियुक्त्यांसाठी पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखालीच कडक निकष बनवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली.
बीड जिह्यातील माजलगाव येथे पोलिसांच्या संगनमताने वाळूची तस्करी करण्यात आल्याविषयीचा तारांकित प्रश्न आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता. दोन पोलिसांना त्याप्रकरणी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते, असा मुद्दा सोळंके यांनी उपस्थित केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना, या प्रकरणात संशयित तीन व्यक्तींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटादेखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा मिळवण्यात आला आहे. त्याच्या विश्लेषणानंतरही पोलिसांचे यात थेट संगनमत सिद्ध करणारे ठोस पुरावे मिळाले नाहीत. तरीही या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सर्व संभाव्य बाबींची सखोल चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी यावेळी स्थानिक पोलिसांकडून पैसे वसुलीचे प्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी सरकार काय करतेय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी क्राईम ब्रँचमधील नियुक्त्यांबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.






























































