
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांकडून मोठ्या घातपाताचा कट रचला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी आयईडी (IED) स्फोटाद्वारे सुरक्षा दलांच्या ताफ्याला किंवा सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून या हल्ल्याचे नियोजन केले जात असल्याचे संकेत सुरक्षा यंत्रणांना मिळाले आहेत. या धोक्याची दखल घेऊन हिंदुस्थानी सैन्य, जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ (CRPF) यांनी संयुक्तपणे संवेदनशील भागात शोधमोहीम तीव्र केली आहे. महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
येत्या काही दिवसांत होणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी किंवा गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने प्रशासनाला कळवण्यास सांगण्यात आले आहे.



























































