शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर नकोत, हायकोर्टाचे आदेश; 53 वर्षे पूर्ण झालेल्यांना दुर्गम भागात बदली नाही

शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर करू नका, असे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. प्रशासकीय गरज व अपवादात्मक परिस्थितीतच या मुदतीनंतर बदल्या करता येतील, असेही न्यायालयाने नमूद केले.

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. नियमानुसार बदली प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होईल. 30 एप्रिलपर्यंत शिक्षकांना बदली आदेश मिळतील. 30 मेपर्यंत शिक्षक बदली ठिकाणी रुजू होऊ शकतील. या प्रक्रियेत बदल करू नका, असे खंडपीठाने बजावले आहे.

वयाची 53 वर्षे पूर्ण केलेल्या महिला व पुरुष शिक्षकांची दुर्गम भागात बदली करू नका, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. संच मान्यतेसाठी 2024 मध्ये जारी केलेल्या जीआरवरही न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार 10 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शिक्षकाची बदली होणार आहे.

पतीपत्नी 30 किमीच्या अंतरात

 पती-पत्नी शिक्षकांची नियुक्ती 30 किमीच्या अंतरात असावी या नियमाचेही काटेकोरपणे पालन करा, असेही न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण 

गेल्या वर्षी राज्य शासनाने संच मान्यता व शिक्षकांच्या बदल्यांविषयी जीआर जारी केला. याविरोधात अॅड. सुरेश पाकळे यांच्या मार्फत शेकडो याचिका दाखल झाल्या. यावर 52 पानी निकाल देत न्यायालयाने या याचिका निकाली काढल्या.