
जीवन संपविण्याची कारणे विविध असतात. परिणामी याचा आधार घेत गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
मानवी मन अनेक प्रकारे व्यक्त होत असते. एकाच गोष्टीवर प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात. त्यामुळे आत्महत्येचे कारण गुन्हा नोंदवण्याचे प्रमाण होऊ शकत नाही. हा गुन्हा नोंदवण्यासाठी ठोस पुरावा आवश्यक असतो, असे न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या एकल पीठाने नमूद केले.
एका सफाई कामगाराच्या आत्महत्ये प्रकरणी दोन कंत्राटदारांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या दोघांनी याचिका केली होती. या दोघांनी सफाई कामगाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने या दोघांविरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द केला.
आरोपावर गुन्हा दाखल होत नाही
आरोपी पीडिताला त्रास देत होते. त्याला कामावर घेत नव्हते, असे वाद प्रत्येक आस्थापनेत होत असतात. त्यामुळे पीडिताने त्रास दिल्याचा आरोप केला म्हणून थेट गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.































































