जन्मदात्रीची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व इतर अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी सुनील कुचकोरवीच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
आरोपी सुनील कुचकोरवीला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जुलै 2021 मध्ये फाशी सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात कुचकोरवीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. याबाबत दीर्घ सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मंगळवारी अपील फेटाळले. यावेळी आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खंडपीठापुढे हजर केले होते. अशा दुर्मिळातील दुर्मिळ गुह्यातील आरोपीला माफी नाही. त्याच्या हातून घडलेल्या नरभक्षक प्रवृत्तीला ठेचण्याचीच गरज आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले आणि फाशीवर शिक्कामोर्तब केले.
ठोस पुराव्यांच्या आधारे दोषत्व सिद्ध
पोलिसांनी हत्या झालेल्या महिलेच्या शरीराचे अवयव जुळण्यासाठी फॉरेन्सिक व डीएनए चाचणीचा अवलंब केला होता. सरकारी पक्षाने 12 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष तपासली. तसेच हत्या झालेले ठिकाण व मृतदेहाची स्थिती दाखवून देणारे ठोस पुरावे सादर केले होते. त्याआधारे जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी आरोपी सुनील कुचकोरवीला फाशी सुनावली होती. उच्च न्यायालयात सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी पोलिसांची बाजू मांडली आणि हा गुन्हा सर्वात क्रूर स्वरूपाचा असल्याचे ठोस पुराव्यांनिशी सिद्ध केले.
न्यायालय म्हणाले….
‘‘हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. आरोपीने केवळ जन्मदात्रीची हत्या केली नाही तर तिचे मेंदू, हृदय इत्यादी अवयव काढले व ते चुलीवर शिजवण्याचा प्रयत्न केला. हे नरभक्षक कृत्य आहे. अशा दुर्मिळातील दुर्मिळ गुह्यात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा योग्यच आहे.’’
नेमके प्रकरण काय?
दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सुनीलने आईची हत्या केली. हत्या केल्यानंतर आईचे काळीज व इतर अवयव बाहेर काढून शिजवून खाण्याचाही प्रयत्न केला होता. कोल्हापूरमध्ये 28 ऑक्टोबर 2017 रोजी ही घटना घडली होती. रक्तबंबाळ अवस्थेतील आईच्या मृतदेहाशेजारी सुनील बसल्याचे शेजारच्या मुलाने पाहिले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. थरकाप उडवणाऱ्या या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती.